पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले
राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्मल आणि हरित वारीवर भर देऊन त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जी-२० बैठकीसाठी १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी यादरम्यान पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदांनी शौचालयाची सातत्याने स्वच्छता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
पालखी सोहळा नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठका घेण्यात आल्याचे सांगून आयुक्त म्हणाले, पालखी मार्ग आणि पालखी तळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप चा उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी दिली. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
Pune Bogus School Scam : बोगस इंटरनॅशनल स्कूल, तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या सहीने खळबळ..!