लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज गुरुवारी (ता.27) सकाळी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांत सिद्धार्थ भंडारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहरातील मुक्काम आटोपल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील मुक्कामासाठी पहिल्यांदाच कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी स्थळावर येणार आहे. त्यामुळे पालखी स्थळावर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुख सुविधा देण्याचे काम सुरु आहे. आता पालखी स्थळावर 20 कामगार काम करीत आहेत. 15 टिपर मुरूम टाकत आहेत. तर 3 जेसीबी, 2 रोलर व ट्रक्टरच्या माध्यमातून सपाटीकरण, देखबाल व दुरुस्तीकरणाचे काम चालू आहे.
दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 339 वी पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळावर 2 जुलै मुक्कामी येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पालखी स्थळाची पाहणी केली. पालखी स्थळाचे अल्पावधीतच चांगल्या दर्जाचे काम झाल्याचे समाधान व्यक्त करून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
यावेळी अपर तहसीलदार तृप्ती कोलते, गट विकास अधिकारी भूषण जोशी, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, उपसरपंच नासेर पठाण, चित्तरंजन गायकवाड, सतीश काळभोर, दीपक काळभोर, शब्बीर पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.