पुणे : पुणे शहर व परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे शुक्रवारी, २६ जुलै २०२४ पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट येथील शाळांना सुट्टी जाहीर याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.
पुणे आणि पिंपरी हवामान विभागाने येत्या काही तासात पिंपरी चिंचवड शहर परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे शहरातील शाळा २६ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.