पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: सध्या तापमानात कमालीची वाढ झाल्याने शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. मात्र कृषी पपांना लागणाऱ्या विजेचा लंपडाव व अपुऱ्या दाबाने होत असलेला वीजपुरवठा यामुळे पिकांना पाणी देता येणं शक्य नसल्याने शिरूर तालुक्यातील नागरिक व शेतकरी हैराण झाले आहेत.
तालुक्यातील कृषी पंपाकरिता आठ तास वीज दिली जाते. यामध्ये चार तास दिवसा व चार तास रात्रीची वीज दिली जाते. मात्र विजेचा लपंडाव वारंवार सुरु असल्याने शेतकरी पूर्णतः हैराण झाला आहे. एप्रिल महिन्यापासून हा प्रकार सुरु झाला असून, महावितरणचे कर्मचारी, वायरमन यांच्याशी संपर्क करुनही काहीही उपाययोजना होत नसल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
तालुक्यातील तापमान 41 ते 42 अंश सेल्सीअसवर गेल्याने पिकांना पाणी देणे क्रमप्राप्त झाले आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तालुक्यातील अनेक कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना मर्यादा असतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
कृषी पंपाच्या साडेसात एचपीपर्यंत वीज माफी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या समस्यांवर ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा पंप घेण्याकडे कल वाढला आहे.
यंदा कमालीचा उन्हाळा कडक जाणवत असून, सकाळी 10 पासूनच उन्हाच्या तीव्रतेने नकोसे होत असून, सायंकाळी 5 पर्यंत उन्हाचा तडाखा कायम राहत आहे. त्यात विजेचा लंपडाव सातत्याने सुरु आहे. नागरिक व शेतकरी सातत्याने तक्रारी करत असतानाही त्याची दखल घेतली जात नाही.
उन्हाळा असल्याने लस्सी, आईसक्रीम, थंड पाण्याची बाटली व अन्य थंड पेये दुकान व हॉटेलात विक्रीकरिता ठेवली जातात. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने अशा पदार्थांचे मोठे नुकसान होत असून, त्यातून व्यावसायिकांना फटका बसत आहे.
सध्या उन्हाळा सुरु असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे. याबाबत सोनेसांगवी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या रांजणगाव कार्यालयात निवेदन दिले असून, वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंबेगाव शिरुर शिवसेनेचे तालुकाप्रमुख मल्हारी काळे यांनी दिला आहे.
विजेची मागणी वाढल्यामुळे वीज वारंवार खंडित
विजेची मागणी वाढल्यामुळे वीज वारंवार खंडित होत आहे. ही समस्या अनेक ठिकाणी जाणवत आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने विजेची मागणी मोठया प्रमाणात वाढते. त्यामुळे वीज पुरवठ्यावर ताण येऊन वीज खंडित होते. असे महावितरणचे उपअभियंता दिपक पाचुंदकर यांनी सांगितले.