पुणे: संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रारंभ श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यातून होणार असून समारोप जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या देहूगाव येथे होणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२३’चे यंदाचे ६ वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, माकणी, उमरगा, नाईचाकूर, औसा, लातूर, तेर, धाराशिव, कसबे तडवळे, येरमाळा, वाशी, भूम, पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, बोधेगाव, पैठण,संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे देहूगाव येथे जाणार आहे. ही वारी ८ जिल्ह्यातून १३५० किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. संतांनी सांगितलेल्या समता, बंधूता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे.
सदरील समता वारीचे सदिच्छादूत म्हणून प्रती गाडगेबाबा समाज प्रबोधनकार आणि कवी फुलचंद नागटिळक यांची निवड करण्यात आल्याचे समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी सांगितले.
कोण आहेत फुलचंद नागटिळक?
फुलचंद नागटिळक गाडगेबाबांचा वेश परिधान करून गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. गेली पंचवीस वर्षापासून खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा संत गाडगेबाबा यांचा वेश परिधान केला आहे. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा, शिक्षण, शेती, पर्यावरण रक्षण यातील समस्या दूर करण्यासाठी राष्ट्र संत गाडगेबाबांच्या मार्गांचा अवलंब करत आहेत. फुलचंद नागटिळक यांच्या वारीतील सहभागाने वारीचा विचार समाजापर्यंत जाण्यासाठी मदत होणार आहे .