पुणे : उन्हाळी सुट्या संपल्या, शाळांचे नवीन वर्ष सुरु झाले आहे. फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेल्या शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या रंगाची दप्तरे घेतलेले आणि आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली, काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली लहान मुलं. हे दृश्य आज यवत परिसरात सर्व शाळांमध्ये दिसून आले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळा पुन्हा सुरू झाल्या. नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली.
यवत येथील जिल्हा परिषद शाळेची सकाळी साडेसातला घंटा वाजली. पहिल्याच दिवशी यवत गावासह वाड्या वस्तीवरील अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव झाला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले.शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये उत्सुकता दिसली. सकाळी सर्वच मुलांनी लवकर उठून तयारी करून शाळेला हजेरी लावली. राष्ट्रगीत, प्रार्थना करून विद्यार्थी वर्गात बसले. दोन महिन्यांनी भेटलेल्या मित्रमैत्रीणींसोबत गप्पा व मजाही केली.
राज्यातल्या अनेक शाळा शनिवारी, दि.१५ जून रोजी सुरू झाल्या. अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला. शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. फुगे, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते. वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या.
यवत ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे, राजेंद्र शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते आश्पाक शेख, केंद्रप्रमुख प्रणयकुमार पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे, शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका छाया काळे, यांसह शाळा क्रमांक १ व २ चे सर्व शिक्षक वर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कुठे हसू तर कुठे रडू
शाळेच्या पहिल्याच दिवशी आवारात प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट केली होती. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले.शाळांमध्ये मुलांना चॉकलेट, बिस्कीट व खाऊचे वाटप झाले. यवत येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये जिलेबी वाटप करण्यात आली. यामुळे मुलांच्या चेहर्यावर हसू दिसले.
शाळा सुरू झाल्याने फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेली शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर दप्तर घेऊन आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली, तर काही हिरमुसलेल्या चेहर्याने गप्प उभी असलेली मुले शाळेत दिसून आली. सारे काही नवीन असल्याने मुले कुतूहलाने बघत होती. हसत-खेळत असलेली मुले, रडणार्या मुलांना समजावत असलेले शिक्षक, असे दृश्य शाळेच्या पहिल्या दिवशी पहायला मिळाले.