लोणी काळभोर, ता. 17: छावा चित्रपटाने (Chhaava) सामान्य भारतीयांवर गारूड केले असून अनेकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. म्हणूनच अधिक जाणून घेऊ या विशेष फिचर्समधून
उत्तरेकडील विजयानंतर आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य असलेल्या मराठा मुलखासह दक्षिणेवर विजय मिळवायचा होता. संपूर्ण हिंदुस्थानचा बादशहा होऊन इस्लामी राज्य स्थापन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती, असे अनेक इतिहासकारांनी म्हटले आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजांमुळे त्याला ते शक्य झाले नाही आणि तुलनेने लहान असलेल्या मराठा साम्राज्याने त्याला सळो की पळो करून सोडले आणि त्याचा शेवटी इथंच महाराष्ट्रात अतिशय दु:खात अंत झाला.
औरंगजेबच्या डोळ्यातून अश्रू
छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेबाने अकलूजवरून बहादूरगडावर (पेडगाव) छावणी हलविली ती तारखी होती १५ फेब्रुवारी १६८९. त्यानंतर संभाजीराजांसह कवि कलश व अन्य मराठा सैनिकांना औरंगजेबच्या दरबारात नेण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराजांना कैदखान्यात घेऊन जाण्याची औरंगजेबाने आज्ञा केली.
इतिहासात उल्लेख आलेल्या ईश्वरदास नागर याने याबद्दल लिहून ठेवले आहे. तो लिहितो की दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत छत्रपती संभाजीराजे येऊन पोहोचल्यावर बादशहाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यावेळी संभाजीराजेंकडे बादशहाने पाहिले, तेव्हा त्याच्या मनावर परिणाम झाला. तो आपल्या तख्तावरून खाली उतरला आणि अल्लाहची प्रार्थना करून त्याने आभार मानले.’’ औरंगजेबन जेव्हा आपल्या आसनावरून खाली उतरला, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते असे त्यावेळच्या बखरकारांनी नमूद करून ठेवलेले आहे.
हेही वाचा:Chhaava: छत्रपती संभाजीराजांचे बलिदान झाले, तो स्तंभ आजही अस्तित्वात
संभाजी राजे बादशहासमोर अजिबात झुकले नाहीत
स्वराज्य अभिमानी असलेले छत्रपती संभाजी राजे (Chhaava Chatrapati Sambhaji Maharaj) मात्र बादशहासमोर अजिबात झुकले नाहीत. त्यांनी मानच काय, पण डोळेही लववले नाहीत, असे सांगितले जाते. औरंगजेबाच्या सैन्यातील खाफीखान याने लिहिले आहे की या प्रसंगात कवि कलश महाराजांच्या सोबत होता. त्याचे हातपाय बांधलेले असल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती. मात्र त्याने यावेळेस आपल्या राजाच्या म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंच्या सन्मानार्थ एक हिंदी कविता गायली, हे राजन, तुला पाहून, तुला ताजीम देण्यासाठी आलमगीर बादशहाही आपल्या आसनावरून खाली आला आहे.’
औरंगजेबाला सर्वाधिक त्रास कुणी दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी राजे आणि मराठा साम्राज्याने. मराठा साम्राज्य हे रयतेचे राज्य होते, हिंदवी स्वराज्य होते, म्हणून इतर कुणाही राजांचा बिमोड न करता, किंवा त्यांना ठार न करता छत्रपती संभाजी राजांनाच त्याने कैद केले. याचे कारण तो छत्रपती आणि मराठ्यांना घाबरत होता.
आणि औरंगजेबचे स्वप्त अधुरेच राहिले
खरं तर तो मराठा साम्राज्याचा बिमोड करण्यासाठी बायका, पोरं, नातवंडं, अमीर उमराव, आणि मोठा फौजफाटा घेऊन दक्षिणेकडे आला होता. पण छत्रपती संभाजी राजे आणि मराठ्यांनी त्याला सळो की पळो करून सोडले. त्यामुळेच जेव्हा असा निधड्या छातीचा राजा कैद झाला, तेव्हा औरंगजेबने त्याच्यासमोरच जमिनीवर गुडघे टेकवून परमेश्वराचे आभार मानले. छत्रपती संभाजी राजांच्या हौतात्म्यानंतरही मराठ्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला सळो की पळो करून सोडले आणि आपल्या राजाच्या बलिदानाचा बदला घेतला. अखेरीस अत्यंत निराशा आणि उदासिनतेच्या स्थितीत औंरंगजेबाचा मृत्यू झाला, पण त्याची मराठा साम्राज्य जिंकण्याची इच्छा अपूरीच राहिली असे इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे.