युनूस तांबोळी
पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडत लाखो रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद चिखली येथील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने केली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्रे फिरवत गुजरात येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गोपनीय सुत्रांच्या आधारे तपास करून, फसवणुकीची १५ लाख ४७ हजार रूपये रक्कम फिर्यादीला परत केल्याने व सायबर गुन्ह्यातील तपास पूर्ण केल्याने चिखली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर यांनी तपासकामी महत्त्वाची भूमिका बजावली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश ठाकूर (रा. वडनगर (गुजरात) याने फिर्यादीला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार सुरवातीला फिर्यादीने ५० हजार रूपयांची गुंतवणूक केली. त्यातून त्यांना १ लाख २५ हजार रूपयांपर्यंत नफा झाला. त्यामुळे आरोपीने त्यांना डी मॅट खाते काढून दिले. शेअर बाजारात चांगला नफा होतो, असे आमिष दाखविल्याने फिर्यादीने सुरवातीला १ ते ३ लाखांपर्यंत गुंतवणूक केली. या व्यवहारात सुरवातीला ४० टक्के नफा तर काही प्रमाणात तोटा झाल्याचे सांगितले.
दरम्यान, नफा मिळत असल्याची विश्वासाहर्ता आल्याने फिर्यादीने आरोपीच्या फोनवरून १५ लाख ४७ हजार रूपये टप्प्याटप्प्याने भरले. मात्र, नंतर आरोपीने तोटा झाल्याचे सांगून पुन्हा रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखविले. मात्र, यावेळी फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी तत्काळ चिखली पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर फोनवरून ठिकाणाची माहिती काढत आरोपीचा शोध घेतला. गुजरातमधून आरोपी दिनेश ठाकूर याला अटक करण्यात आली.
आरोपीने १५ लाख ४७ हजार रूपये फिर्यादीला न्यायालयाच्या आदेशाने परत केले आहेत. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोंगले, पोलीस हवालदार राजाराम गोडडांबे, दीपक मोहिते यांनी या शोध मोहिमेत भाग घेतला. पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहे.
सायबर गुन्ह्याची आर्थिक बाजारात फसवणूक टाळण्यासाठी अनोखळी व्यक्तीला आपली खरी माहिती अथवा बॅंकेबाबतची गोपनीय माहिती देण्याचे टाळावे. त्यातून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही. यासाठी कोणताही व्यवहार हा पारदर्शक करावा. शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठी खरी माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर काटकर यांनी सांगितले.