भोर / जीवन सोनवणे : आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिलांना, लहान मुले यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सामाजिक संदेश, सामाजिक ऐक्य, पर्यावरणपूरक देखावे करावे. तसेच नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बेर्डे यांनी गणेश मंडळांना दिल्या.
गणेशोत्सव पारंपारिक वाद्यांच्या साह्याने भक्तिमय वातावरणात साजरा करावा यासाठी भोरला गणेशोत्सव मंडळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला सुरू होत आहे. त्याबाबतची भोर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची आढावा बैठक मंगळवारी (दि.१२) अभिजीत मंगल कार्यालय भोर येथे पार पडली.
यावेळी ‘एक गाव, एक गणपती’ योजना राबविणे, ऑनलाईन परवानगी अर्ज भरणे, गुण निकषांवर आधारित मंडळांना पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. डीजे वाजविताना आवाजाची मर्यादा राखत डेसिबलप्रमाणे राखून वाजवाव. ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिलांना, लहान मुले यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, पर्यावरणपूरक देखावे करणे, कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी.
तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे, तहसीलदार सचिन पाटील व भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी गणेश मंडळांना दिल्या.
मागील वर्षी चांगले कार्य करणाऱ्या मंडळाचा, पोलीस पाटील, पोलिस मित्र यांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी तानाजी बर्डे, सचिन पाटील, शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सुप्रिया झुरांगे, महावितरणचे सचिन राऊत, नगरपालिकेचे कार्यकारी निरीक्षक अमोल जाधव तसेच भोर तालुक्यातील महिला, पुरुष पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, जल आपत्ती व्यवस्थापन सदस्य, सह्याद्री रेस्क्यू टीम, पोलीस मित्र व पत्रकार उपस्थित होते.