पुणे : अॅन्टी करप्शनच्या पुणे विभागाकडून झोपडपट्टी पुर्नवसन कार्यालय, पुणे येथील तत्कालीन उपमुख्य अधिकारी यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाचे तत्कालीन उपमुख्य अधिकारी शिरीष रामचंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा शिरीष यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. या प्रकरणातील आरोपी शिरीष यादव यांनी परिक्षण कालावधीत संपादीत केलेल्या उपसंपदेबाबत पुरेशी व वाजवी संधी देऊन सुद्धा ते समाधान कारकरित्या स्पष्टीकरण देवू शकले नाहीत. तसेच त्यांनी संपादित केलेली मालमत्ता त्यांचे ज्ञात स्त्रोताच्या उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत असल्याने लोकसेवक शिरीष यादव यांनी 1,38,74,044 रुपये इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करुन उद्देश पुर्वक स्वत: ला व त्यांच्या पत्नीला अनुचितपणे अवैधरित्या समृद्ध केले असून त्यास पत्नी प्रतीक्षा यादव यांनी त्यांना अपप्रेरणा दिली आहे. सदरची मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने धारण केलेली अपसंपदा असून ती त्यांच्या लोकसेवक सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कटके करत आहेत.