पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी गेले होते. त्यावेळी मुंबईकडे जात असताना त्यांनी विविध ठिकाणी सभाही घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी पुण्यातील वाघोली परिसरात विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर दीड महिन्यांंनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक महतीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभा घेत मराठा बांधवाना संबोधित केलं होतं. या यात्रेदरम्यान २३ जानेवारी रोजी पुण्यातील वाघोली येथे त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभाही पार पडली होती.
याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची पहाटे तासभर सभा झाली होती. या सभेवेळी आयोजकांनी, विना परवाना सभा घेऊन, विनापरवाना स्पीकर लावून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील लोणीकंद पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह आठ-दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेआधी जरांगे पाटलांची पुन्हा एकदा जाहीर सभा
लोकसभेच्या निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. बीडमध्ये ही सभा होणार असून तब्बल ९०० एकर जागेत हि सभा पार पडणार आहे.