इंदापूर: तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 31 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तंत्र शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. एन.बी पासलकर व डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. विजय वढाई हे उपस्थित होते. तसेच शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य डॉ. आर.के. पाटील आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, खरे शिक्षण हे दहावी व बारावीनंतर सुरू होते. अशा प्रकारचे करिअर मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. व्यावसायिक शिक्षण घेताना निर्णय कधी व कसा घ्यावा? त्याचा उपयोग स्वतःसाठी व तसेच समाजासाठी कशाप्रकारे होतो, याचे विवेचन केले.
पॉलिटेक्निकला प्रवेश कशाप्रकारे घेता येतो? या विषयी डॉ.आर.के. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना माहिती दिली. डॉ. विजय वढाई यांनी फ्युचरॅस्टिक एज्युकेशन व इंडस्ट्री 4.0 याच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन कोर्सेस विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एआय सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशाप्रकारे करून घेतो ,तसेच दहावी व बारावीनंतर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा व तो कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतो, हे उदाहरणासहित सांगितले .
डॉ.पासलकर यांनी मूल्यवर्धित शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरते, याविषयी माहिती दिली .कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांनी फक्त कॉलेजची इमारत न बघता त्या कॉलेजमध्ये शिकवणारा शिक्षक व सुसज्ज ग्रंथालय असणाऱ्या कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यावे, असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या कार्यक्रमास माळेगाव पॉलीटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य वाबळे, बाबासाहेब पॉलिटेक्निक, कळंबचे प्राचार्य ठोंबरे, पानीव पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते .
या करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमास इंदापूर परिसरातील शाळा व महाविद्यालयातील एकूण 200 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली काळे, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सदानंद भुसे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडण्याकरिता महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.