राजु देवडे
लोणी धामणी, ता.१४ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात निरगुडसर, जारकरवाडी, पारगाव, लोणी धामणी शिरदाळे आदी गावांमध्ये भाद्रपती बैलपोळा शनिवारी (ता.१४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यानुसार आपल्या देशात शेतीला अनुसरून अनेक रूढी-परंपरा आहेत, ते त्या-त्या राज्यानुसार आपल्या परंपरा जपण्याचं काम तेथील लोकं करतात.
शेतकऱ्यांसोबत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा. या दिवसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. बैलपोळा साजरा करण्याचा विविध पद्धती महाराष्ट्रात आहेत. खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात श्रावण अमावस्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करतात, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत भाद्रपद अमावस्येला अर्थात भादवी पोळा साजरा करतात.
जारकरवाडी, पारगाव आदी गावांत बैलांची डिजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच भंडाराची उधळण करणेत आली. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो.
त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवतात, त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं
दरम्यान, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो.
बैलांसाठी गोडधोड नैवेद्य….
शेतकरी कुटुंबीयांकडे पोळ्याचा दिवस म्हटला की अतिशय उत्साह असतो. घरात बैलांसाठी खरपूस पुरणपोळी बनिवण्याची तयारी सुरू असते. बैलांच्या स्वागतासाठी घरोघरी सडा रांगोळ्या केलेल्या असतात. दुपारनंतर बैलजोडी घरी आणताना सवाद्य मिरवणूक काढली जाते. त्यानंतर सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू- ज्वारीचे दान मांडून मातीची बैल ठेवतात. पुजेसाठी गावातील इतर घरांतूनही बैलांना आमंत्रित केलं जातं. बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधव दिवसभर उपवास करतात, तो मिरवणूकीनंतर संध्याकाळी सोडतात.
….अशीही पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपाने धर्तीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले. त्यानुसार एकदा कंसने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. मात्र, कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस होता श्रावण अमावास्येचा, यामुळे या दिवशी पोळा सण साजरा करतात.