बारामती, (पुणे) : मावस बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून तिघांनी एकाचा कोयत्याने निर्घृण वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती येथे रात्री घडला आहे. गुरुवारी (ता. 19) रात्री बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर हि घटना घडली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मागील सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत सदाशिव गजाकस (वय- 23, रा. देसाई ईस्टेट बारामती, ता. बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगतीनगर ता. बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर), व संग्राम खंडाळे (पुर्ण नाव व पत्ता माहीती नाही) असे खून करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मयताचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस (वय -25) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी. कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर अनिकेत हा नंदकिशोर अंभोरे याची मावस बहीण वैष्णवी शेवाळे हीच्याशी बोलत असल्याच्या कारणावरुन नंदकिशोरअंभोरे, महेश खंडाळे, संग्राम खंडाळे यांनी मिळुन भाऊ अनिकेत गजाकस यास गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने वार करुन त्यास जीवे ठार मारले.
दरम्यान, अभिषेक गजाकस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके करत आहेत.