उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी फैजान शकील शेख याने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत महाराष्ट्राला ब्राँझपदक मिळवून दिले आहे. तमिळनाडू, पंजाब, दिल्ली, हरियाणाला हरवून फैजान शेखने ब्राँझपदक पटकाविले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, भारतीय शालेय खेळ महासंघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत अकोले येथे राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातून १ हजार ४१७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांचे ३६ संघ सहभागी झाले होते.
देशभरातून एकूण १५०० वर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उरुळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयातील फैजान शेख याने १४ वर्षे वयोगटात तेलंगणा, पंजाब, दिल्ली व हरियाणाला हरवून महाराष्ट्राला ब्रांझ पदक मिळवून दिले. त्याच्या या उत्तुंग कामगिरीमुळे विद्यालयाचे नाव देशभरात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे.
दरम्यान, या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना महसूल मंत्री व अकोले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य, सर्व प्रशासकीय वर्ग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन फैजान शेख याचे कौतुक केले.