पुणे : पुण्यातील बोपदेव घाट येथे मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर आता पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट आणि सायरन बसवले जाणार आहे. बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या दारू पार्ट्या, गुन्हे, चोऱ्या, लूट आणि विविध प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे अशी माहिती आहे. अशातच आता पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट आणि सायरन आपत्कालीन परिस्थितीत महत्वाचा ठरणार आहे. टेकड्यांवर घडणा-या अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी आता प्रशासन आणि पोलीस जागे झाले आहेत.
यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीसांना आदेश देत म्हणाल्या की, शहरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असलेल्या दिसून येत आहेत. अशावेळी पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. शहरातील घाटपरिसर तसेच निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. तसेच अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाश झोत तसेच भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी.