पाबळ / योगेश पडवळ : कारेगाव (ता.शिरुर) येथे एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. त्याला तीन वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
मेहमुद फारुख शेख याने डॉ. महेश पाटील असे खोटे नाव वापरुन श्री मोरया हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सुरु केले होते. आरोपी मेहमुद हा बारावी अनुत्तीर्ण असताना त्याचे वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे शिक्षण झालेले नाही. त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना देखील त्याने एमबीबीएस पदवीचे बनावट सर्टिफिकेट तयार करुन त्याआधारे डॉ. महेश पाटील या बनावट नावाने श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयसीयू सुरु केले. या हॉस्पिटलमध्ये २०१८ ते २०२१ या कालावधीत पेशंटवर औषधोपचारही त्याने केले होते. कोविड काळामध्ये त्याने औषधोपचार केलेल्या रुग्णांपैकी एकूण ७ रुग्ण कोविड-१९ आजारामध्ये दगावले.
याबाबत डॉ. शितलकुमार राम पाडवी (वय 45 वर्षे, (एमबीबीएस डीजीओ) रा. गार्डन व्हिला, नवापुर, ता. नवापुर, जि. नंदुरबार) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बोग डॉक्टर मेहमुद फारुख शेख याच्याविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व १८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.