पुणे : भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षांचे योग्यप्रकारे निर्वाहन करावे; असा कानमंत्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच आगामी २२ जानेवारी हा सर्वांसाठी आनंदोत्सवचा दिवस आहे. भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडल कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप आणि कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, शहर आणि मंडचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नाही, तर सामाजिक संघटना म्हणून काम करते. त्यामुळे पक्षाचे पद हे केवळ पद नसून जबाबदारी आणि अपेक्षा आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. तसेच संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही पक्षाची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील ही जबाबदारी आणि अपेक्षा योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. त्यासाठी आवश्यक सर्वती ताकद पक्षाकडून दिली जाईल.
पुढे बोलताना म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होऊन २२ जानेवारी रोजी रामचंद्रांची प्रतिष्ठापना होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या आनंदोत्सवसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी अशी सूचना यावेळी केली.