दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यामधील गंगावळण येथील काही मुठभर लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश केलेले हे लोक आता टक्केवारी घेणाऱ्यांच्या टोळीत सहभागी झाले आहेत. हा पक्ष प्रवेश निष्ठा म्हणून केला नसून, तो आर्थिक लालसेपोटी केला असल्याचा घणाघाती आरोप भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुषार खराडे यांनी केला.
खराडे पुढे म्हणाले की, ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यांना भारतीय जनता पक्षाने बिनविरोध निवडून दिले आहे. मात्र, हेच लोक आता गावाच्या दृष्टीने गद्दार निघाले आहेत. इंदापूरमध्ये कमिशन व टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी गेल्या चार-पाच वर्षांपासून फोफावली आहे. त्यामध्ये अनेक निष्क्रिय लोकांचा सहभाग आहे. त्याच निष्क्रिय लोकांच्या भूलथापांना बळी पडून गंगावळणमधील काहींनी गावाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे तुषार खराडे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला भाजपबरोबर यावे लागते. मात्र, इंदापूरमधील काही लोक संघाच्या सानिध्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावामध्ये बिनविरोध सरपंच झाले. हे लोक जर सतत असे पक्ष बदलत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गावातील जनमताच्या विरोधात जाऊन विरोधी भूमिका घेत असतील, तर अशा लोकांना गावातील सुज्ञ नागरिक खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही तुषार खराडे यांनी सांगितले.