पुणे: प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला २००८ आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालिन काँग्रेस सरकारकडे मागितले गेले. हे पुरावे मागितल्यावर काँग्रेसच्या वकीलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर जन्मभूमीचे पुरावे दिले आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर साकारायला परवानगी मिळाली. मोदी सरकार आल्यानेच मंदिर साकारले, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
अयोध्येत श्रीराम दर्शनासाठीची १४०० रामभक्तांची महाराष्ट्रातील दुसरी आस्था रेल मंगळवारी पुण्यातून मार्गस्थ झाली, त्यानंतर बावनकुळे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या भाजपा पदाधिकारी आणि रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी सरकार आले म्हणूनच राम मंदिर साकारले, असे सांगून बावनकुळे पुढे म्हणाले, ‘ श्रीराम मंदिर साकारल्याबद्दल जगभरातील हिंदू मोदीजींचे आभार मानत असून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत, यातच त्यांचा नास्तिकपणा उघड झाला. त्यामुळे ठाकरेंचे बेगडी प्रेम आणि हिंदुत्व जनतेच्या लक्षात आले.
‘केवळ मतांच्या राजकारणासाठी उद्धव अयोध्येला गेले नाहीत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव किती खाली गेलेत हे कळले. शिवाय सावरकरांचा अपमान केला गेला, हिंदु सनातन धर्म संपवून टाकू, असे सांगणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनसोबत उद्धव यांनी युती केली. काँग्रेसमधून दर्शनाला कोणी गेले नाही, तर उद्धव ठाकरेंनी न जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.