उरुळी कांचन, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात भरधाव डंपरने दुभाजकावरून वळण घेण्यासाठी थांबलेल्या दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. 08) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अपघातात मयत झालेल्या तरुणाचे अद्याप नाव समजू शकले नाही. अपघात झाल्यानंतर सदरचा डंपर चालक पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तळवाडी चौकातून दुचाकी चालक हा रस्ता ओलांडण्यासाठी दुचाकीवर थांबला होता. यावेळी पुण्याच्या बाजूकडून सोलापूरच्या बाजूने एक भरधाव डंपर निघाला होता. यावेळी रस्ता दुभाजकावर थांबलेल्या दुचाकीला डंपर ने जोरदार धडक दिली. यामध्ये सदरचा तरुण हा डंपर च्या पुढच्या चाकाखाली आला. यावेळी डंपर चालक हा त्या ठिकाणावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त तरुणाच्या शरीराला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. यावेळी परिसरातील अक्षय बंटी कांचन, मयूर कुंजीर, संदीप कांचन, नितीन कांचन, सुरज कांचन, आकाश कांचन, यांनी लाईफ केअर रुगवाहिकेचे अध्यक्ष सिद्धू चव्हाण यांच्याशी संपर्क करून तात्काळ जखमी तरुणाला लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी उरुळी कांचन पोलिसांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.