पुणे : कापूरहोळ-भोर मार्गावरील नेकलेस पॉईंटच्या उतारावरील संमगनेर गावच्या हद्दीत वेगवान डंपर आणि दुचाकीच्या आपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा मुलगा थोड़क्यात बचावला आहे. लताबाई येलमकर (वय ६५, रा. उंदेरी, ता. महाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, अपघातानंतर डंपरचालक पळून गेला आहे.
सुदैवाने मुलगा अविनाश येलमकर (वय ३९) हा थोडक्यात बचावला. कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी या मार्गाच्या दुरूस्तीचे व विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. ठेकेदाराने सुरक्षीततेच्या उयायोजना न केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अविनाश येलमकर कुटुंबासह खडकवासला येथे कामानिमित्त राहात आहेत. मकरसंक्रांतीच्या सणासाठी अविनाश येलमकर आणि त्यांची आई मूळगावी उंदेरी (ता.महाड, जि.रायगड) येथे दुचाकीवरून जात होते. नेकलेस पॉईटच्या उताराला रस्त्यावर खडीमुळे त्यांची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले.
त्यावेळी रस्त्याच्या कामासाठी समोरून असलेला डंपरचा वेग जास्त असल्यामुळे लताबाई यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला तर अविनाश थोडक्यात वाचले. अपघातानंतर डंपरचालक आणि रस्त्यावर काम करणारे कामगारही पळून गेले. त्यामुळे लताबाईंना लगेच उपचार मिळाले नाहीत.
सद्यस्थितीत मांढरदेवीच्या यात्रेला जाणा-या भाविकांमुळे कापूरहोळ-भोर रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मात्र ठेकेदाराने सुरक्षीततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.