दिल्ली: ऊरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशन बाबत मोठी घोषणा संसदेत करण्यात आली आहे. मागील काही काळापासून पुणे रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात याविषियी पुणे शहराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता पुण्यातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी अनेक खासदारांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. त्यानंतर उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मोठी घोषणा केली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले..
अधिक माहिती अशी की, संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उरुळी कांचन येथे सर्वांत मोठे टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी संसदेत दिली. याबरोबरच पुण्यातील चार रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी संसदेत दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव बुधवारी या विषयावर संसदेत बोलत होते.
पुणे शहर हे शैक्षणिक हब…
ते म्हणाले, पुणे शहर हे शैक्षणिक हब बनले आहे. त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी वाढत आहे. त्यामध्ये जबलपूर, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून पुण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे. पुण्यातून रेल्वे गाड्या वाढवण्यासाठी तेथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये चार स्टेशनचा विकास केला जात असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

प्रवाशांना होणार फायदा
तसेच शहरातील हडपसर टर्मिनल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच उरुळी कांचन येथेही मोठे टर्मिनल उभे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर गाडी उतरून ती गाडी देखभाल व दुरुस्तीसाठी उरुळीला जाईल. त्यानंतर रेल्वेगाडी पुन्हा पुणे रेल्वे स्थानकामार्गे प्रवास करेल. यामुळे स्टेशनचा विकास करून रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.







