मुंबई: आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्याशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. चव्हाण यांच्यावर व्यापारी रावसाहेब देसाई यांच्यासह अनेक लोकांची २४.७८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. तपासात चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडितांना सवलतीच्या दरात सरकारी निवासस्थाने देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुणे आणि ठाणे महानगरपालिकांकडून विकास हक्क प्रमाणपत्रे (DRCs) देण्याचे आश्वासन दिले होते, असे EOW च्या तपासात उघड झाले आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याला साक्षीदार असल्यामुळे समन्स
महिला पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणात साक्षीदार म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात तिला आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर, ज्यात नारायण सावंत आणि यशवंत पवार यांचा समावेश आहे, देसाई आणि इतर पीडितांना फसवल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडितांकडून पैसे घेतल्याचा आणि कमी दरात घर देण्याचे आश्वासन देऊन पीडितांची फसवणूक केली आहे. फसवणुकीसाठी चव्हाण यांनी बनावट करारपत्रे तयार केली आणि ठाणे-५ येथील उपनोंदणी कार्यालयात त्यांची नोंदणी झाल्याचे पीडितांना भासवले त्यामुळे या तपासात अनेक जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात २० जणांची सुमारे २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केली असून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
EOW पुढील तपास करेल
तक्रारीनुसार मार्च २०१५ ते एप्रिल २०२४ दरम्यान अनेक पीडितांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पिदितांकडून घेतलेले पैसे चव्हाण यांनी थेट स्वतःच्या बँक खात्यात जमा केले असे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच, बनावट दस्तऐवजांच्या प्रती तक्रारदारांना दिल्या. मात्र, रक्कम देऊनही तक्रारदांना जागा अथवा पैसे परत मिळाले नाहीत, असे तपासात समोर आले आहे.