हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावरील उरुळी कांचन (Uruli Kanchan) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकासह उरुळी कांचन गावातील आश्रम रस्ता व महात्मा गांधी रस्ता या दोन्ही मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मागील काही वर्षांपासून असलेली अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या नोटीसा अतिक्रमणधारकांना लोणी काळभोर पोलिसांनी बजावल्या आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ‘सिंघम’ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने कोणीतरी सर्वसामान्यांच्या समस्यांची दखल घेतंय, याची चर्चा उरुळी कांचन नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.
दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावील तळवाडी चौकासह उरुळी कांचन (Uruli Kanchan) ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश अतिक्रमणधारकांना राजकीय पुढारी, गावकारभारी व त्यांच्या बगल बच्च्यांचा आर्शिवाद असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांचा आहे. तळवाडी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच गावातील अतिक्रमणे काढण्याच्या मागणीस स्थानिक राजकीय पुढारी आणि गावकारभारी यांनी शशिकांत चव्हाण यांच्या समोर संमती दर्शवली आहे. तरी, उरुळी कांचनचे यापुर्वींचे “गुंडाड” राजकारण लक्षात घेता हे अतिक्रमण काढण्याचे “शिवधनुष्य” शशिकांत चव्हाण यांना पेलवणार का? याकडे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे दोघेही दहा दिवसांपूर्वी तळवाडी चौकातील वाहतूक कोंडीत तासभर अडकले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे शहर पोलिस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आदेश दिले. त्यानंतर लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकात चव्हाण यांनी आठ दिवसांपूर्वी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अनेक स्थानिक राजकीय पुढारी, गावकारभारी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्वांनी तळवाडी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मागणी अगदी बेंबीच्या देठापासुन लावुन धरली होती.
तळवाडी चौकात वाहतूक कोंडी होणे, ही बाब मागील दोन वर्षांपासून नित्याचीच बनली आहे. उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असताना चौकातील कोंडीचे प्रमाण हे आताच्या तुलनेत कमी होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून तळवाडी चौकाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागणे, ही बाब सर्वसामान्यांच्या व रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला रस्त्यात बेकायदा थांबलेली दुकानदारांची चारचाकी वाहने, बेकायदा वाहतूक प्रवाशी करणाऱ्या जिप, रिक्षाची अस्ताव्यस्त पार्कींग व वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्व दुर्लक्ष ही तळवाडी चौकात वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणे आहेत. मात्र, वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करण्याच्या ऐवजी वेगळ्याच कामात उर्जा खर्च करत असल्याने, चौकाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसुन येत आहेत.
पुणे-सोलापुर महामार्गाप्रमाणेच उरुळी कांचन गावातील आश्रम रोड व महात्मा गांधी रस्ता या दोन्ही मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मागील काही वर्षांपासून अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. तसेच उरुळी कांचन हद्दीतील एखाद्या दुकानदाराचा अपवाद वगळता, बहुतांश दुकानात येणाऱ्या ग्राहकांची व दुकान मालकांची वाहने रस्त्यात उभी राहत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. बहुतेक शाळा, सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार केंद्र आणि पतपेढ्या यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनांचे रस्त्यावर पार्किंग केले जाते. परिणामी गावातील वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, कामगार आणि प्रवाशी यांना नित्याच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरुळी कांचनमधील चौकाचौकात झालेली अतिक्रमणे काढणे आणि चौकांना मोकळा श्वास घेऊ देण्याची गरज निर्माण झाली आहे. भर वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला विविध व्यावसायाची दुकाने आणि हॉटेल्स टाकल्याने चौकांना तर चक्क चौपाटीचे स्वरूप आले आहे.
दुसरीकडे गावातील बहुतांश रस्त्याच्या कडेला विशेष करून चौका-चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. कोणीही यावे आणि रस्त्याच्या कडेला दुकान थाटावे, अशी अवस्था या भागात झाली आहे. कोणी विचारत नाही आणि कोणाला भाडे द्यावे लागत नसल्याने स्थानिकांसह अनेक परप्रांतीय लोकांनी अतिक्रमणे करून व्यवसाय सुरू केले आहेत. तर, काही प्रमुख चौकात जागा शासनाची आणि भाडे घेणारे दुसरे अशी परिस्थिती आहे. अतिक्रमणे करून दुकानदारी थाटण्याचे प्रमाण मोठे आहे. चहा, पान टपऱ्या, हॉटेल, फळांची दुकाने, चिकन सेंटर, रसाचे गुऱ्हाळ, पाणीपुरी गाड्या अशा प्रकारची दुकाने टाकून अतिक्रमण केले जात आहे. याचा सर्वात मोठा फटका वाहतुकीला बसत आहे. दौंड तालुक्यातील काही कंपन्या सुटण्याच्या वेळेस तर अशा भागात मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कामगारांना वेळेवर कामावर हजर होता येत नाही किंवा घरी परतायला देखील उशीर होतो.
महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्या मांडल्याचे चित्र..
उरुळी कांचन शहरातून जाणार्या पुणे – सोलापूर महामार्गाच्या पथकर मार्गावर तसेच उरुळी गावातील पालखी मार्गावरील महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुणे – सोलापूर महामार्गाच्या कडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारल्या आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ केलेले नाही. त्यामुळे इमारतीत जाणार्या लोकांच्या दुचाकी, चारचाकी, वाहने चक्क रस्त्यावर उभ्या केल्या जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि वाहतुकीस अडथळा येतो. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पथकर नावाला असून त्यावरती टपरीवाले, भाजीविक्रेते आणि इतर विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत.
पैशासाठी अतिक्रमणधारकांशी साटेलोटे..
उरुळी कांचन हद्दीतील महामार्गासह उरुळी कांचन (Uruli Kanchan) गावातील पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याच्या बाजूला नातेवाईक, भाडेकरू, मित्रमंडळी यांना टपरी, हातगाडी लावण्यास संबंधित घरमालक व स्थानिक पुढारी व गावकारभाऱ्यांनी आपआपल्या सोईनुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे या हातगाड्यांना राजकारणी व संबंधित घरमालकांचे खतपाणी मिळत असल्याने बिनधास्तपणे अतिक्रमण झाले आहे. काही राजकीय नेते तर अतिक्रमण केलेल्या टपरी चालकांकडून पैसे घेत चैन करीत असल्याच्या चर्चा वारंवार “गाढव” कट्ट्यावर बिनधास्त चघळल्या जात असतात. अतिक्रमणधारकांना स्थानिक राजकीय पुढारी, गावकारभारी व त्यांच्या बगल बच्च्यांचा आर्शिवाद असल्याने, पोलिसांच्या आवाहनाला ग्रामपंचायत प्रतिसाद देणार का? व अतिक्रमण काढण्याचे “शिवधनुष्य” शशिकांत चव्हाण यांना पेलवणार का? याकडे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.