लोणी काळभोर, ता.17: जावयाने सासऱ्याला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली आहे. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचासुद्धा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका परिसरात असलेल्या गुजरवस्ती जवळ मंगळवारी (ता.16) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बापुराव गायकवाड (सध्या रा. पाण्याच्या टाकीजवळ घोरपडेवस्ती रोड, लोणीस्टेशन लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे मुळ रा. कुर्डुवाडी जि. सोलापुर) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी जिजा विठ्ठल जावळे (वय 60, सध्या रा.कवडीपाट टोलनाका, गुजर वस्ती ता हवेली जि पुणे, मूळ रा. क्रांती नगर पाटोदार ता. पाटोदा जि. बीड) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजा जावळे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना शितल नावाची मुलगी आहे. शीतल यांचा संतोष गायकवाड यांच्याशी विवाह झाला आहे. त्यामुळे जिजा व संतोष हे दोघे नात्याने सासरे-जावई आहेत.
दरम्यान, जावळे हे मंगळवारी रात्री घरी असताना, जावई संतोष हे तेथे येऊन म्हणाले माझी पत्नी शितल कुठे आहे? अशी विचारणा केली. तेव्हा फिर्यादी यांनी माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर संतोष गायकवाड याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी जिजा जावळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी संतोष गायकवाड याच्यावर भारतीय न्याय संहीता 2023 कलम 118(1), 115(1), 352, 351 (1), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केतन धेंडे करत आहेत.