लोणी काळभोर, ता. २८ : धारधार शस्त्रासह हॉकी स्टिकने एका टोळक्याने चौघांना बेदम मारहाण करून खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ रविवारी (ता. २७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज प्रशांत वाघामारे (वय १६) शंकर सुनिल कदम (वय १७ पत्ता गोपाळपटटी मांजरी), शाहीद ताजुदिदन शेख (वय १७) व सर्वश संभाजी काळे (वय -१७ पत्ता गोपाळपटटी मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्रेम व त्याचे अनोळखी ५ साथीदार (सर्वांचे पूर्ण नाव , वय, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुरज वाघामारे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद सुरज वाघामारे हा हडपसर परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र शाहीद शेख, सर्वेश काळे, शंकर कदम हे कवडीपाट टोलनाका येथील इराणी चहाचे हॉटेलजवळ सोमवारी ( २८) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास थांबले होते. तेव्हा फिर्यादी यांचा मित्र कदम हा तेथे थांबलेल्या तीन इसमांना म्हणाला कि, प्रेम कुठे आहे? प्रेम कडे माझे पैसे आहेत, मला घ्यायचे आहेत? असे म्हणताच सदर तीन इसमांनी कांही वेळातच तेथे आणखी तीन इसमांना बोलावून घेतले. आणि मगाशी प्रेम बद्दल विचारणारा कोण होता रे ? असे म्हणून शिवीगाळ करुन शंकर कदम यास हॉकी स्टीक व धारदार हत्याराने मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी मारहाण करण्यास सुरवात केल्यानंतर फिर्यादी वाघामारे व त्यांचे मित्र घटनास्थळावरून पळून जाऊ लागले. पळून जात असताना , आरोपींनी शंकर कदम यास कवडीपाट टोलनाक्याच्या पुढे असलेल्या गुलमोहर लॉन्स समोर ब्रिजवर पकडले. व प्रेम याने त्याच्याकडील धारदार हत्याराने शंकर कदम याचा जीवे मारण्याचे उददेशाने डोक्यात धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींची फिर्यादी वाघामारे त्याचा मित्र सर्वेश व शाहीद यास पकडून हॉकी स्टीकने मारहाण केली. प्रेम याने शाहीद शेख याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या मारहाणीत चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर लोणी काळभोर येथील एका बड्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
याप्रकरणी सुरज वाघामारे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ६ आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहीता २०२३ कलम १०९ (१), ११८ (१), १८९ (२), १८९ (४), ३५२, ३५१ (३) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५). महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकाने आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
हॉटेल, पान टपऱ्या, हातगाड्या व टी सेंटर रात्रभर चालू
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडी पाट टोलनाका, लोणी स्टेशन, एम आय टी कॉर्नर, माळी मळा व थेऊर फाटा या ठिकाणी रात्रभर हॉटेल, पान टपऱ्या, अंडा भुर्जीसह इतर खाद्य पदार्थाच्या हातगाड्या व टी सेंटर रात्रभर सुरु असते. त्याचबरोबर काही बार व बिअर शॉपीमध्ये रात्रभर मद्यविक्री बिनदास्त सुरु असते. त्यामुळे भुरट्या गुन्हेगारांचा या परिसरात सुळसुळाट असतो. यातून असे छोटे मोठे गुन्हे घडून भाईगिरीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे हे अवैध कामांना पाठबळ देणारे व्यवसाय पोलीस प्रशासनाने रात्री अकरा नंतर बंद करावेत. अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.