जीवन सोनवणे
भोर, ता.२८ : पुणे सातारा महामार्गावर घरगुती गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना हरिश्चंद्री चौकात बुधवारी (ता.२८) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने गॅस टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती भारत गॅस पुरवठा करणारा एक टँकर सातारा पुणे महामार्गावर हरिश्चंद्री येथे वळण घेत असताना, चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले. चालकाने अचानक ब्रेक लावल्याने टँकरला झटका लागून गॅस टँक आणि ट्रक ट्रॉली यांना जोडणारी क्लिप तुटला. त्यामुळे टँकरचा तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला टँकर पलटी झाला. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात चालक थोडक्यात बचावला आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, गॅस टँकर पलटी झाल्याने काही वेळ चौकातील वाहतूकिवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली होती. मात्र राजगड पोलीस यांना माहिती मिळताच, त्यांनी महामार्ग पेट्रोलिंग दलास ही माहिती कळवली.
या घटनेची महामार्ग कर्मचारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकर क्रेन च्या साहाय्याने बाजूला काढला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.