जीवन सोनवणे
Bhor News : भोर/हवेली : तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या खेड शिवापूर परिसरात मुरुम माफियांनी मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. सपाटीकरणाच्या नावाखाली येथून हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे मुरूम उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाचे याला पाठबळ असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे मत आहे.
महसूलचे पाठबळ असल्याचे ग्रामस्थांचे मत
भोर तसेच हवेली तालुक्यात मुरूम चोरीचे प्रस्थ वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती मुरुमाची बेकायदेशीररीत्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. (Bhor News) राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशिनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे, याचे गणित सामान्य माणसाला उलगडत नाही.
कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टीधारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन यांची चौकशी करून, कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bhor News) तालुक्यात व भागात असलेल्या इतर गौण खनिजांबाबत देखील हेच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हायवेलगत असणाऱ्या गावात दिल्या गेलेल्या खानपट्टा परवान्यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास होत आहे.
परवाना नसताना उत्खनन
जिल्हा किंवा तालुका प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नाही, तरी देखील मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केले जात आहे. तालुका प्रशासनाने परवाना दिला नाही. मात्र, हजारो ब्रास माती-मुरुमाचे उत्खनन केले जात आहे.
प्रशासनाची डोळेझाक
परिसरात नियमबाह्य मुरुमाचे उत्खनन होत आहे. संबंधित कंत्राटदारांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाच्या कारवाईकडे डोळेझाक करीत, बेकायदेशीररीत्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हायवेलगत असून देखील याकडे कुणाचेही लक्ष नाही. (Bhor News) प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. परिणामी सपाटीकरणाच्या नावाखाली रात्रंदिवस मुरुमाची बेधडकपणे वाहतूक होत असून, स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
महामार्गालगत नूतन व्यवसाय सुरू करण्यासाठी टेकडी फोड
महामार्गालगतच्या जागेमध्ये टेकड्या फोडून त्याठिकाणी सपाटीकरणाच्या नावाखाली नूतन व्यवसायासाठी सपाट जागा तयार करून, त्याठिकाणी असणारा मुरूम त्याच ठिकाणी वापर न करता इतरत्र वापरला जात आहे. (Bhor News) प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे का, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
सपाटीकरणाच्या नावाखाली उत्खनन
खेडशिवापूर परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या जमिनी व टेकड्या यांचा सपाटीकरणाचा तात्पुरता परवाना घेऊन, त्याचठिकाणी असणारा मुरूम इतर ठिकाणी राजरोसपणे वापरला जात आहे.