तुषार सणस
Bhor News : भोर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी शांततेचा मार्ग स्वीकारत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. याच्या निषेधार्थ भोर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्व पदाधिकारी व तरुण एकत्र येत संपूर्ण भोर शहर बंद ठेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला.
संपूर्ण भोर शहर बंद
या निषेध मोर्चामध्ये सर्व समाजातील नागरिकांनी, जाती, धर्म, पक्ष, बाजूला ठेवत झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करत मोर्चास पाठिंबा दर्शविला. (Bhor News) या मोर्चामध्ये व्यापारी वर्ग आणि स्थानिक व्यावसायिकांनी संपूर्ण दिवस कडकडीत बंद ठेवत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. हे आंदोलन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौपाटी येथून सुरू करत नगरपालिका, एसटी स्टँड, बजरंग आळी, पोलीस स्टेशन मार्गावरून पुन्हा चौपाटी या ठिकाणी एकत्र येत, भोर बंदची हाक देण्यात आली.
…तर तोंडात मारून न्याय मिळवू
‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना गांधीगिरी स्टाईलने गुलाबपुष्प देत यापुढे असा प्रकार सहन केला जाणार नाही. (Bhor News) न्याय तोंडाने मागून जर मिळणार नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवू, अशाप्रकारे सरकारवर निशाणा साधत कोणतेही निवेदन न देता खडेबोल सुनावले. या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकारी, तरुण, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात होते.