लोणी काळभोर, ता.०२ : काम करत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने एका १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात शुक्रवारी (ता.१) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. धर्मराज रामनरेश सरोज (वय १९, रा.बोरकरवस्ती, लोणी काळभोर, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीमुसार, धर्मराज सरोज हा परप्रांतीय असून, लोणी काळभोर परिसरात मजूर म्हणून काम करत होता. शुक्रवारी काम करत असताना धर्मराजला अस्वस्थ वाटू लागले आणि तो अचानक जमिनीवर कोसळला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने लोणी काळभोर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी धर्मराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर धर्मराजचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
धर्मराजचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर येईल. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.