यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील खामगाव येथील गाडीमोड परिसरातील एका गुऱ्हाळावर काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील 23 वर्षीय निष्पाप मजुराचा जेसीबीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. मात्र, हा गंभीर अपघात कायदेशीर कारवाईच्या भीतीने लपवण्यासाठी गुऱ्हाळ मालक आणि चालकाने मृतदेह कारच्या डिकीत टाकून तो वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालकासह चौघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.

अविनाश बाळासाहेब यादव (जेसीबी मालक), गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार, व आलम (जेसीबी चालक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. तर रामू शंभू पासी (वय 23, रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तो एप्रिल 2026 पासून खामगाव येथील गाडीमोड येथील गुऱ्हाळावर मजुरीचे काम करत होता. याप्रकरणी त्याचा भाऊ राजू शंभू पासी याने यवत पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गाडीमोड येथील गुऱ्हाळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. यावेळी जेसीबी चालक आलम याने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून तेथे झोपलेला मजूर रामू पासी याच्या अंगावर घातले. जेसीबीचे अवजड चाक अंगावरून गेल्याने रामूचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देऊन कायदेशीर प्रक्रिया करण्याऐवजी जेसीबी मालक अविनाश यादव याने गुऱ्हाळावर उपस्थित असलेल्या इतर मजुरांना आणि प्रत्यक्षदर्शींना “हा प्रकार कोणालाही सांगू नका, अन्यथा जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली होती. तसेच दडपण्यासाठी यादव, जगताप, इस्तकार आणि चालक आलम यांनी तत्काळ संगनमत केले. त्यांनी मृत रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत कोंबला. पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी हा मृतदेह वाघोली-राहू रस्त्यावर नेऊन टाकला.
रामूचा मृत्यू हा गुऱ्हाळावर नसून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने (हिट अँड रन) झाला आहे, असा बनाव रचण्याचा प्रयत्न या संशयितांनी केला. गुऱ्हाळावरील ठेकेदार तमेरेज फरीदी यांनी रामू बेपत्ता झाल्याची माहिती उत्तर प्रदेशातील त्याच्या कुटुंबीयांना दिली. भाऊ बेपत्ता झाल्याचे समजताच राजू पासी हा उत्तर प्रदेशातून तातडीने दौंड येथे आला. दोन दिवस त्याने परिसरात सर्वत्र भाऊ रामूचा शोध घेतला. अखेर 21 जून रोजी त्याने गुऱ्हाळावर जाऊन तेथील मजुरांकडे कसून चौकशी केली असता, काही प्रत्यक्षदर्शींनी धाडस करून घडलेला सर्व प्रकार राजूला सांगितला.
दरम्यान, राजू पासी याने तात्काळ यवत पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. यवत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्र फिरवली असता, संशयित आरोपींचा हा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.







