पुणे: पुण्यातील बावधन परिसरात जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूस-नांदे रस्त्यावरील एका बांधकाम साइटवर झालेल्या या प्रकारानंतर बावधन पोलिसांनी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचे साथीदार संदेश माने यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

याप्रकरणी नागेश मोहन राठोड (वय 21, रा. नऱ्हे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बाळासाहेब चांदेरे (वय 54, रा. सूस गाव) आणि संदेश माने (वय 37, रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश राठोड, राहुल प्रेम सरकार आणि मेहबूब हबीब शेख हे ओम पॅराडाइज इमारतीसमोरील बांधकाम साइटबाहेर गप्पा मारत उभे होते. रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब चांदेरे तेथे आले. यावेळी संबंधित जमिनीच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. फिर्यादीनुसार, त्यानंतर बाळासाहेब चांदेरे यांनी पिस्तूल बाहेर काढले. त्यामुळे उपस्थितांनी जीव वाचवण्यासाठी पळण्यास सुरुवात केली. याचवेळी चांदेरे यांनी पिस्तुलातून एक गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.







