पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरात पाळीव कुत्र्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर रूप धारण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने संतापाच्या भरात घरातून 12 बोअरची लोडेड बंदूक आणून शेजारी राहणाऱ्या नातेवाईक महिलेच्या घराच्या खिडकीवर रोखली. तसेच महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी इंदूदेवी तेजबहादूर सिंग राठोड (वय 63, रा. डिफेन्स कॉलनी, लोहगाव) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पाळीव कुत्र्यामुळे परिसरात घाण होत असल्याच्या कारणावरून आरोपी तरुणाचा महिला आणि त्यांच्या मुलीसोबत वाद झाला. शाब्दिक बाचाबाची वाढल्यानंतर आरोपी थेट आपल्या घरी गेला आणि 12 बोअरची लोडेड बंदूक घेऊन परत आला.
यानंतर त्याने बंदूक महिला आणि त्यांच्या मुलीच्या दिशेने तसेच घराच्या खिडकीवर रोखून संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड घाबरले आणि त्यांनी तातडीने लोहगाव पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे वडील भारतीय लष्करात कार्यरत असून सध्या कोलकाता येथे नियुक्त आहेत. तक्रारदार महिला या आरोपीच्या नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे.
कौटुंबिक नातेसंबंध असूनही किरकोळ कारणावरून बंदूक रोखून धमकी दिल्याच्या या घटनेमुळे डिफेन्स कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







