न्हावरे: न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील शेंडगेवस्ती येथील पठारावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. याचदरम्यान शेळ्या राखणाऱ्या कमल शेंडगे यांच्यावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड करून आणि काठीने बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे कमल शेंडगे सुदैवाने बचावल्या. या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.17)दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कमल शेंडगे या शेंडगेवस्ती परिसरातील पठारावर नेहमीप्रमाणे शेळ्या राखत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कमल शेंडगे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे कमल शेंडगे सावध झाल्या आणि त्यांनी मोठ्याने आरडाओरड करत हातातील काठीने बिबट्याला हुसकावून लावले.

मात्र, याप्रसंगी ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने पुन्हा उसाच्या फडाबाहेर येऊन शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात अमर भिवा शेंडगे यांची शेळी ठार झाली.घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी…..
शेंडगेवस्ती परिसरात बिबट्याची दहशत वाढत असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपच्या भटक्या-विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष बिरदेव शेंडगे यांनी केली आहे. नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व मेंढपाळांकडून व्यक्त होत आहे.






