पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.. या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत नंतर हत्येचा कट उघडकीस आला होता. मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी केतनच्या वडिलांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत अग्रवाल कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

पोलीस तपासात या हत्येमागील कटकारस्थान समोर आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सिया आणि तिच्या प्रियकराला (चेतन) पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी न्यायालयात सुमारे 5,053 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले असून, त्यात संशयितांचे डिजिटल पुरावे आणि तपासातील सर्व तपशील समाविष्ट आहेत.

घटनेचा संपूर्ण घटनाक्रम:

25 मे: सिया आणि चेतन यांनी केतनचा काटा काढण्याचा (हत्या करण्याचा) कट रचला.
31 मे: सिया केतनसोबत पहिल्यांदा लोहगड येथे गेली आणि तेथे हत्येसाठी निर्जन जागेची रेकी केली.
4 जून व 6 जून: 6 जूनला बालीला जाण्याचे नियोजन होते, परंतु एकत्र राहणे टाळण्यासाठी 4 जूनलाच हत्येचा बेत आखला गेला. तो अयशस्वी झाल्यावर मुंबई विमानतळाकडे जाताना फुड मॉलवर सियाने केतनचा पासपोर्ट कचऱ्यात फेकून दिला, ज्यामुळे बाली दौरा रद्द झाला.
14 जून व 19 जून: 19 जूनला सियाच्या वाढदिवसासाठी महाबळेश्वर येथे बुकिंग करण्यात आले होते. त्यापूर्वी 14 जून रोजी पुन्हा एकदा लोहगडावर हत्येचा प्रयत्न झाला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे या प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, आता न्यायालयातील पुढील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे






