लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी आता भरदिवसाही बंद घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कवडीपाट येथील भापकर प्लॉटिंग परिसरातील चितामणी हाईट्स सोसायटीत दोन फ्लॅटचे दरवाजे फोडून चोरट्यांनी सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. शुक्रवारी (ता. 16) सकाळी साडेआठ ते सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

राहुल उत्तम इवरे (वय 38, व्यवसाय रेल्वे विभागात कनिष्ठ लिपिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इवरे हे आई, भाऊ आणि भावाच्या कुटुंबासह चितामणी हाईट्स सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 302 आणि 303 मध्ये एकत्र राहतात. शुक्रवारी सकाळी आठ वाजता राहुल इवरे हे लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर गेले होते. त्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचे भाऊ कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन्ही फ्लॅटच्या दरवाजांचे कोयंडे आणि कुलूप कापून आत प्रवेश केला. सायंकाळी पाच वाजता ड्युटी संपल्यानंतर इवरे घरी परतले असता, फ्लॅटच्या दरवाजाचे कोयंडे आणि कुलूप कापलेले दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता, कपाटातील ड्रॉवर उघडे होते आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली होती. नोकरीसाठी ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दुसऱ्या फ्लॅटमधील लोखंडी कपाटाची तिजोरी उघडी असून, त्यातील सामानही विस्कटलेले दिसले. तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि काही पावत्या चोरीला गेल्याचे उघड झाले. चोरट्यांनी मंगळसूत्र, सोन्याची गळ्यातील माळ, कानातील टॉप्स, बाळी, नथ, चैन, सोन्याचे मणी आणि अन्य दागिन्यांसह एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. मुद्देमालाची चालूबाजार भावाप्रमाणे किंमत सुमारे 14 लाख 50 हजार रुपये आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे हेरून चोरटे भरदिवसा हात साफ करत असल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






