छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून बहीण -भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेची माहिती समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या 30 वर्षीय नराधम भावाला पोक्सो विशेष न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी आरोपीला आजन्म कारावास (जन्मठेप) आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये आरोपीने पीडित मुलीला शेतातील एका शेडमध्ये नेऊन तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला होता. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास किंवा आरडाओरड केल्यास स्वतःसह संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. या भीतीपोटी पीडितेने गप्प राहणे पसंत केले, ज्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीच्या काळातही आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान, 6 जानेवारी 2025 रोजी मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने पालकांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती तब्बल 32 आठवड्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. हे ऐकून हादरलेल्या पालकांनी चौकशी केली असता पीडितेने तिच्यावर झाले असल्याच सांगितले..

याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 8 जानेवारी 2025 रोजी आरोपी चुलत भावाला अटक केली. या प्रकरणाचा तपास एपीआय ज्ञानेश्वर साखळे आणि एपीआय सिद्धेश्वर गोरे यांनी पूर्ण करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले.
न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वरी नगुला यांनी बाजू मांडली, तर पोलीस उपनिरीक्षक एम. ए. मोरे, विद्या चव्हाण आणि शिला घुगे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयात पुरावे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली






