उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर स्विफ्ट कारला दुचाकी आडवी लावून ढोलपथकातील पाच जणांनी कारचालक तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून कारच्या काचा व आरसे फोडल्याचा प्रकार घडला आहे . सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर पेट्रोल पंपाजवळील श्रीसाई गॅरेजसमोर रविवारी (ता. 27) पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी सुरताल ढोलपथकातील सदस्यांसह त्यांच्या साथीदारांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार..करण्यात आली आहे.

निखील बाळासाहेब पवार (वय 28, रा. राहिंजवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलिसांनी तेजस भोसले, मयुर सटाणे, पंकज रणसिंग रॉकेट (पुर्ण नाव माहीत नाही), केतन अडागळे व पथकातील अन्य अशी मारहाण केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील पवार हे पहाटे मित्र रामा देवकर याच्यासोबत स्विफ्ट कारने (एम.एच.12 यूएफ 8751) उरुळी कांचन येथील फ्लोरा हॉटेल परिसरात नातेवाइकांना सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते मित्रासह लोणी काळभोर येथील घरी परतत असताना सुरताल ढोलपथकातील तेजस भोसले, मधुर सटाणे, पंकज रणसिंग, केतन अडागळे आणि अन्य साथीदारांनी दुचाकी कारसमोर आडव्या लावून त्यांची गाडी अडवली.

त्यानंतर कोणतेही कारण नसताना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप निखील पवार यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांच्या नाकाला, डोळ्याला, पाठीला, दोन्ही हातांना आणि डाव्या पायाला दुखापत झाली. इतक्यावरच न थांबता दुचाकीवरील 5 ते 6 जणांनी स्विफ्ट कारचे दोन्ही आरसे आणि चारही बाजूंच्या खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले.
दरम्यान, कारची चावी काढून घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर निखील यांना त्यांचा भाऊ संदीप पवार यांनी पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल केले. तपास पोलीस हवालदार कमलेश होले करीत आहेत.







