पुणे : हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या (लाईन-३) १७ स्थानकांवरून लवकरच मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून आणखी पाच स्थानकांना सुरक्षा मंजुरी मिळाली असून, या स्थानकांवरील किरकोळ तांत्रिक त्रुटी येत्या दहा दिवसांत दूर करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर १७ स्थानकांसह सुमारे २३ किलोमीटरच्या मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन सज्ज होणार आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेवरील एकूण २३ स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांना यापूर्वीच सुरक्षा मंजुरी मिळाली होती. आता आणखी पाच स्थानकांची तपासणी पूर्ण करून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित स्थानकांवर सुरक्षा तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या किरकोळ त्रुटी दूर केल्यानंतर १७ स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मेट्रो सेवेच्या उद्घाटनाची अंतिम तारीख आणि त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. संपूर्ण मार्गिकेवरील उर्वरित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, काही कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मेट्रो स्थानकापासून नागरिकांना थेट कार्यालय किंवा घरापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’वरही प्रशासनाकडून भर दिला जात आहे. स्थानकांच्या परिसरातील रस्ते आणि पथदिव्यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी होणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के खर्च पीएमआरडीए आणि ५० टक्के खर्च एमआयडीसीकडून केला जाणार आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्कसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना वाहतूककोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.






