बारामती : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे चिन्ह दिसत असून, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. आज, ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वानेवाडी येथे पुरुषोत्तम जगताप यांनी सभासदांचा एक विशेष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने जगताप भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीतूनच ते आपली पुढील रणनीती आणि उमेदवारांची नावे स्पष्ट करण्याची शक्यता आहे.दरम्यान जगताप यांच्या आजच्या भूमिकेनंतर सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या बाजूला, राजकीय वर्तुळात अजूनही प्रचंड उत्सुकता कायम आहे कारण कोणत्याही प्रमुख पक्षाने अथवा गटाने अद्याप आपले अधिकृत पॅनल जाहीर केलेले नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेला भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या कारखान्याच्या सत्तासंघर्षात शरद पवार आणि अजित पवार यांचे गट आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून युगेंद्र पवार यांनी आधीच इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाने उमेदवारांची चाचपणी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वतंत्र पॅनल उभे करणार, यावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.






