पुणे : महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य उपकरणांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागात वीज अपघाताच्या घटना घडतात. या अपघातांमध्ये अनेकदा मनुष्यांसह पशुधनालाही जीव गमवावा लागतो. जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकरी आणि पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज अपघातात मृत्यू झालेल्या जनावरांच्या भरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणकडून वीज अपघातामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, सन २००६ नंतर पशुधनाच्या भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली नव्हती. गेल्या १८ वर्षांत पशुधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जुनी भरपाई अपुरी ठरत होती. ही बाब लक्षात घेऊन आता नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

नव्या दरानुसार वीज अपघातात गाय, म्हैस, बैल, घोडा किंवा गाढव यांसारख्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे. तर शेळी, मेंढी आणि वासराचा वीज अपघातात मृत्यू झाल्यास पाच हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. महावितरणच्या तुटलेल्या विद्युत तारा, वीज खांब, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड किंवा उघड्या डीपीमधून वीजप्रवाह उतरल्याने जनावरांचा अपघात झाल्यास ही भरपाई लागू होणार आहे.

भरपाई मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. वीज अपघात झाल्यानंतर पशुपालकांनी तातडीने स्थानिक महावितरण कार्यालय, पोलीस ठाणे आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून जनावराचा शवविच्छेदन अहवाल आणि पंचनामा करून घेणे आवश्यक आहे. तसेच महावितरणच्या विद्युत निरीक्षकांकडून अपघाताचा चौकशी अहवाल घ्यावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज महावितरणच्या संबंधित उपविभागीय कार्यालयात सादर करावे लागतील. भरपाईच्या रकमेत झालेल्या या वाढीमुळे वीज अपघातात पशुधन गमावलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक मदत मिळणार आहे.







