पुणे : लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना हिंजवडी येथे घडली. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत २४ वर्षीय तरुणी जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत काम करते. तिचे आरोपीसोबत मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. सोमवारी पहाटे तरुणी तिच्या बहिणीसोबत कामावर जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवले. ‘तुझ्यामुळे मला कामावरून काढून टाकले आहे. तू माझ्याशी का बोलत नाहीस? आपण लग्न करू,’ असे आरोपीने तिला सांगितले.

मात्र, तरुणीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने तरुणीला खाली पाडले आणि तिच्या छातीवर, पाठीवर तसेच हातावर धारदार चाकूने वार केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात तरुणी जखमी झाली.

यानंतर आरोपीने स्वतः उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास फौजदार ताकतोडे करीत आहेत.






