मुंबई : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पक्षाच्या सर्व विभाग प्रमुखांची मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मातोश्री’ निवासस्थानावरील या बैठकीत,ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात जाऊन दिवंगत पूर्णेकर यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे पूर्णेकर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून पक्षाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन देणार आहेत. एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या हत्येमुळे ठाण्यात राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे.

पूर्णेकर यांच्या हत्येमागे राजकीय वर्चस्व किंवा विविध प्रकल्पांमधील आर्थिक व्यवहारांचे कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला असून या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, बाळू पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घटनास्थळी आणि रुग्णालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.






