शिरूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शिरूर तालुक्यात सहकाराच्या राजकारणाला चांगलीच धार आली आहे. एका जागेसाठी माजी आमदार अशोक पवार, राजेंद्र जासूद आणि स्वप्नील गायकवाड यांच्या नावांची चर्चा सुरू झाल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य उमेदवारीचा तिढा आणि त्यानंतर होणारी राजकीय जुळवाजुळव यामुळे शिरूरच्या पीडीसीसीच्या जागेची लढत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

पीडीसीसीच्या 2026-27 ते 2031-32 या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विकास सोसायटी मतदारसंघातील ठरावांच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून सहकारी संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांबरोबरच कोणाच्या मागे किती संस्था, कोणत्या नेत्यांचे समर्थन आणि कोणत्या गटाचे संघटनात्मक बळ आहे, याचीही चर्चा रंगू लागली आहे.

अशोक पवारांचा अनुभव विरुद्ध जासूद-गायकवाडांची मोर्चेबांधणी

शिरूर तालुक्यात माजी आमदार अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून प्रमुख दावेदार मानले जात आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणाचा अनुभव आणि तालुक्यातील राजकीय संपर्क ही त्यांच्या संभाव्य उमेदवारीची प्रमुख बाजू मानली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून राजेंद्र जासूद आणि स्वप्नील गायकवाड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून अखेर कोणाला उमेदवारी मिळते, यावर शिरूरच्या निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. स्वप्नील गायकवाड यांच्याकडे स्व. अरुणआबा गायकवाड यांच्या सहकारातील राजकीय वारशाची पार्श्वभूमी आहे. तर राजेंद्र जासूद यांना पंचायत समितीच्या राजकारणाचा अनुभव असल्याने दोन्ही इच्छुकांकडून स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.
गायकवाड की जासूद? अजित पवार गटासमोर उमेदवारीचा पेच
शिरूरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून दोन प्रमुख नावे चर्चेत असल्याने पक्ष नेतृत्वासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. एकाच गटातील दोन इच्छुकांपैकी कोणाला मैदानात उतरवायचे, याचा निर्णय झाल्यानंतरच लढतीचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. जर जासूद किंवा गायकवाड यापैकी एकाचे नाव अंतिम झाले, तर अशोक पवार विरुद्ध संबंधित उमेदवार अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारीवरून गटांतर्गत मतभेद राहिल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या गणितावर होऊ शकतो. त्यामुळे सध्या शिरूरच्या राजकीय वर्तुळात ‘गायकवाड की जासूद?’ हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
ठरावांच्या राजकारणाला वेग
पीडीसीसीच्या निवडणुकीत सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या ठरावांना महत्त्व असल्याने इच्छुक उमेदवारांकडून संस्थात्मक पाठिंबा मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही सहकारी संस्थांचे ठराव आपल्या बाजूने असल्याचा दावा विविध गटांकडून केला जात असला, तरी त्याचे अंतिम चित्र निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या ठराव कोणाच्या बाजूने, संस्था कोणाच्या पाठीशी आणि नेत्यांचा कौल कोणाला, याची गणिते मांडली जात आहेत. सहकाराच्या या निवडणुकीत स्थानिक राजकारणाचा प्रभाव किती राहतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल पाचर्णेंची भूमिका ठरणार महत्त्वाची?
शिरूरच्या राजकीय समीकरणात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांची भूमिकाही चर्चेत आली आहे. सहकाराच्या निवडणुकीत त्यांची भूमिका कोणत्या दिशेने जाते, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिरूर तालुका दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला असल्याने पीडीसीसीच्या निवडणुकीत तालुक्यातील विविध राजकीय गटांचे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या भूमिका आणि स्थानिक गटांची ताकद यामुळे निवडणुकीला वेगळे राजकीय परिमाण मिळण्याची शक्यता आहे.
‘सहकार’च्या मैदानात राजकीय शक्तिप्रदर्शन?
पीडीसीसी बँक ही पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असल्याने या निवडणुकीकडे केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले जात नाही. बँकेच्या राजकारणातून जिल्ह्यातील सहकारातील प्रभावाचेही चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या बँकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे वर्चस्व असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यातून उमेदवारी, संस्थांचे ठराव, पक्षीय पाठिंबा आणि स्थानिक राजकीय गटबाजी यांचा कस लागणार आहे.
शिरूरचा कौल कोणत्या समीकरणाला बळ देणार?
एकीकडे अशोक पवार यांचा राजकीय अनुभव, तर दुसरीकडे अजित पवार गटातील जासूद आणि गायकवाड यांची संभाव्य मोर्चेबांधणी, तसेच भाजपच्या स्थानिक राजकीय समीकरणांचा प्रभाव यामुळे शिरूरची पीडीसीसीची जागा महत्त्वाची ठरणार आहे. अजित पवार गटाकडून जासूद की गायकवाड यापैकी कोणाला संधी मिळणार? अशोक पवार यांच्याविरोधात कोणता चेहरा मैदानात उतरणार? आणि सहकारातील संस्थांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार? या प्रश्नांची उत्तरे उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच स्पष्ट होतील. मात्र, संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत येताच शिरूरमध्ये पीडीसीसीच्या निवडणुकीची राजकीय रंगत वाढली असून, पडद्यामागील बैठकांना आणि राजकीय जुळवाजुळवीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे.







