सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण, ता. ०२ : भिगवण बस स्थानकामधून दोन एसटी बसेस सोलापूरच्या दिशेने जात होत्या. मात्र, एकमेकांच्या पुढे जाण्याच्या चढाओढीत एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी (ता. ०२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गंगाराम सोमा पवार (वय ६२, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमी झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. भिगवण बस स्थानकापासून अगदी १०० मीटर अंतरावर हा अपघात घडल्यामुळे एसटी चालकाने ब्रेक फेलचे कारण दिले. हे कारण संशयास्पद वाटत असल्याने भिगवण पोलिसांकडून पाठपुरावा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण बस स्थानकातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भिगवण बस स्थानकामधून सोलापूरच्या दिशेने दोन एसटी बसेस पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या होत्या.
सोलापूरच्या दिशेने जात असताना चालकांनी एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सेवा रस्त्यावरील डाव्या बाजूला असणाऱ्या एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. व एका गॅरेजच्या समोर गप्पा मारत असणाऱ्या दोन व्यक्तींना सुरुवातीला या बसने धडक दिली. तसेच बस पुढे जाऊन गॅरेजच्या बाहेर लावलेल्या सात ते आठ दुचाकींना धडकली.
त्याचवेळी सेवा रस्त्यावरून चाललेले गंगाराम पवार हे जीव वाचवण्यासाठी गॅरेजच्या दिशेने पळत होते. नेमकं त्याचदरम्यान गॅरेजबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी व एसटी यांच्यामध्ये सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर एसटी बस सेवा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या झाकणावर जाऊन थांबली.
दरम्यान, या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे मात्र समजली नाही. या अपघातानंतर एसटी चालक स्वतःहून भिगवण पोलीस ठाण्यात हजर राहिला. दरम्यान, सेवा रस्त्यांच्या बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. त्यामुळे पोलीस आतातरी सेवा रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई करणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.