पिंपरी: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. माझ्यावर खूप अन्याय झाला असून घराणेशाही, झुंडशाहीपुढे मी झुकणार नाही, माझ्यासाठी सर्व राजकीय पर्याय खुले आहेत, असे स्पष्ट मत भोईर यांनी व्यक्त केले.
भोईर यांनी २००९ साठी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. तसेच पाच वेळा नगरसेवक, युवक काँग्रेस, काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी जबाबदारी सांभाळलेले सर्वात जेष्ठ नेते म्हणून भोईर यांची ओळख आहे. नाट्य परिषदेच्या निमित्ताने शहरात सांस्कृतिक चळवळ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पूर्वी दिवंगत रामकृष्ण मोरे आणि नंतरच्या काळात शरद पवार आणि अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे. आता कोणत्याही परिस्थितीत भोईर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
यावेळी भाऊसाहेब भोईर म्हणाले, जून महिन्यापासून मी विधानसभेची तयारी करत आहे. आत्तापर्यंत एक लाख लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून आगामी चिंचवड विधानसभा लढणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातील चार ते पाच माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा लढण्याची आग्रही भूमिका घेतली.
त्यानंतर आता अजित पवार गटातील भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा लढण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटात देखील दोन गट आहेत का? यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीने वेळोवेळी मला डावलले असून आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे भोईर म्हणाले. मला सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत, असे म्हणत त्यांनी बंडखोरी करण्याचा आणि पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला आहे.