पुणे : बंगळूर येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला त्यानंतर तेथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या असून तपासासाठी ‘एनआयए’चे पथक पुण्यात दाखल झाले आहेत.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील ब्रूकफील्ड या उच्चभ्रू परिसरातील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह १० नागरिक जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले.
टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला हा संशयित दहशतवादी कॅफेत प्रवेश करताना आढळून आला. स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून तो तेथून पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले आहे. स्फोट घडवण्यासाठी टायमरसह आयईडी उपकरण वापरण्यात आले होते. स्फोटानंतर संशयित दहशतवादी बंगळूरमधून बसने पसार झाला. तो बल्लारी बसस्थानकात उतरल्याची माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. बल्लारी स्थानकातून तो दुसऱ्या बसने गोकर्णपर्यंत गेला. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला आहे. मात्र, तो नक्की पुण्यात आला की दुसऱ्या ठिकाणी गेला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
याबाबतची माहिती तपास यंत्रणांनी ‘एनआयए’च्या पुणे आणि मुंबईतील पथकांना दिली आहे. बंगळूर आणि बल्लारी बसस्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. भटकळ आणि गोकर्ण बसस्थानकातील चित्रीकरणाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.