संतोष पवार
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ आता शुभ्र शिधापत्रिका धारकांनाही मिळणार आहे. याआधी आरोग्याच्या उपचाराकरिता सदर योजनांचा लाभ फक्त केशरी रेशनकार्ड धारकांनाच मिळत होता . परंतु, आता केशरीसह पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26.2.2019 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची सांगड घालून राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा लाभ पांढऱ्या रंगाचे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबाना होणार आहे. या योजनांचा लाभ देण्याकरिता आणि आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. त्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचनाही सर्व जिल्हा अन्नधान्य पुरवठा व वितरण अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांनी काढले आहेत.