यवत(पुणे): दौंड तालुक्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण करावी असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले असून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या दि . 19 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहेत.
2024 डिसेंबर महिन्यापासून श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT (DIRECT BENEFIT TRANSFER) पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होत आहे.
यामध्ये दौंड तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे एकुण 6506 लाभार्थी पोर्टलवर नोंदविण्यात आलेले असुन त्यापैकी 4592 लाभाथ्यांचे आधार पडताळणी (व्हेरिफिकेशन) पुर्ण झालेले आहे. परंतु अजूनही 1914 लाभार्थ्यांचे आधार पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रलंबित आहे.
शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांचे आधार पडताळणी केल्याशिवाय बँक खात्यात अनुदान जमा होणार नाही. यासाठी तहसिल स्तरावरुन तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यांना आधार पडताळणी (व्हेरिफिकेशन) करुन घेण्याबाबत वेळोवेळी आव्हान करण्यात आले होते.
परंतु अजूनही अनेक लाभार्थ्यांनी पडताळणी करण्याचे बाकी आहे. तरी राहिलेल्या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन तहसिल कार्यालय, दौंड संजय गांधी शाखा येथे आधार व्हेरिफिकेशन करुन घ्यावे किवा मंडळ स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.